| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबई कुर्ला येथील पर्यटकांच्या वाहनाला माथेरान घाटात भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी (दि.25) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत. माथेरान घाटातील पिटकर पॉइंट येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चार प्रवासी प्रवास करीत असलेली मारुती स्विफ्ट कार थेट 25 फूट खाली रस्त्यावर कोसळली आणि अपघात घडला.
मुंबई कुर्ला येथील चार प्रवासी आपली मारुती स्विफ्ट कार घेऊन माथेरानमध्ये आले होते. माथेरान घाटातील पिटकर पॉइंट येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने चार प्रवासी प्रवास करीत असलेली मारुती स्विफ्ट कार थेट 25 फूट खाली रस्त्यावर कोसळली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडी मधील जखमी प्रवासी यांना तत्काळ नेरळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. डॉ शेवाळे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये जखमी चारही प्रवासी यांच्यावर उपचार करण्यात आले असून, एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य तीन प्रवासी यांना किरकोळ मार लागला आहे.
या अपघातात कुर्ला मुंबई येथील श्रीधर साळुंखे, सोहेल शेख, चेंबूर येथील आकाश गायकवाड आणि कुर्ला येथील अहमद खान अशी जखमीची नावे आहेत. नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व प्रवासी पर्यटक यांचे दैव बलवत्तर म्हणून चौघे प्रवासी वाचले आहेत. वळणावरील रस्त्यावरून त्यांचे वाहन खालच्या रस्त्यावर कोसळून देखील जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. माथेरान घाटातील या पिटकर पॉइंट वरील मागील एका महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.







