बिबट्याचा हल्ला! चिमुकलीला घरातून फरफटत नेले

। नाशिक । वृत्तसंस्था ।
इगतपुरी वनक्षेत्रातील भांडारदरावाडी येथील खेडमधील काननवाडी गावातील गट नं – 253 मध्ये बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. गौरी गुरुनाथ खडके असं या चिमुकलीचं नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरीवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानं तिचं निधन झालं.

गौरी ही रात्री घराच्या दाराजवळ आईसमवेत बसलेली होती. त्याचवेळी बिबट्यानं चिमुकलीवर झडप घालून तिला जंगलात खेचून नेलं. हे कळताच गौरीची आई, वडील व आजोबांनी जिवाच्या आकांतानं आरडाओरड सुरू केली. बिबट्याचा पाठलाग केला. आरडाओरडा झाल्यामुळं घाबरलेल्या बिबट्यानं गुरतुले येथील जंगलात मुलीला सोडून धूम ठोकली. मुलीच्या मानेवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

रात्रीपासून घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच खालावल्यानं वन विभागाच्या पथकानं गौरीला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं होतं. मात्र, उपचारांना यश आलं नाही. आज दीड वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. वन विभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिक येथील दक्षता पथकाला काननवाडीला रवाना करण्यात आलं आहे.

Exit mobile version