। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच चोंढी-बामणसुरेजवळ असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पुलमध्ये बुडून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 24) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतिक्षा सुरेंद्रकुमार दास (दोन वर्षे ) असे या मृत मुलीचे नाव आहे. झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या बंगल्यामध्ये कामानिमित्त सुरेंदकुमार त्याची पत्नी व मयत मुलगी अतिक्षा असे तिघेजण राहात होते. या बंगल्यामध्ये केअर टेकर म्हणून मागील आठ वर्षांपासून हे जोडपे काम करत आहे. गुरुवारी सायंकाळी बंगल्यामध्ये तिघेजण होते. पाण्याचा टँकर आल्याने सुरेंद्रकुमार बंगल्याच्या परिसरात गेले. तेथील काम आटोपून ते पुन्हा बंगल्यामध्ये आले. मात्र, त्यांना त्यांची मुलगी बंगल्यात दिसली नाही. तिचा बंगल्याच्या परिसरात शोध घेतला असता ती बंगल्याच्या आवारातील स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या अवस्थेत तरंगताना दिसली. तिला स्विमींग पूलमधून बाहेर काढून उपचाराकरिता अलिबागच्या रुग्णालयात सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आणले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून ती यापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.