तीन वेटलिफ्टर्सचाही समावेश
| नवी दिल्ली | वार्ताहर |
गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या अकरा खेळाडूंनी डोपिंग केल्याचे सिद्ध झाल्याने तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, या खेळाडूंनी डोपिंग केल्याचे लगेच मान्य केल्याने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) त्यांच्यावर चार वर्षांऐवजी तीन वर्षांची बंदी घातली आहे. यात अॅथलेटिक्सच्या तीन खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश आहे.
ही बंदी 6 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. कमलजित कौर, अजय कुमार आणि हरजोधवीर या तीन खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये भाग घेतला होता. पंजाबच्या कमलजित कौर हिने 100 व 200 मीटर शर्यतीत भाग घेतला होता. 200 मीटरमध्ये तिने 23.84 सेकंदासह रौप्यपदक जिंकले होते; तर 100 मीटरमध्ये तिला सहावे स्थान मिळाले होते. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. तिच्या नमुन्यात ड्रोस्टॅनोलोन हे सिंथेटिक अॅनाबोलिक स्टेरॉईड सापडल्याचे नाडाने म्हटले आहे.
यजमान गोव्याचे प्रतिनिधित्व करणार्या अजय कुमारने पाच हजार मीटर शर्यतीत 14 मिनिटे 13.33 सेकंदात ब्राँझ जिंकले होते; तर दहा हजार मीटर शर्यतीत सहावे स्थान मिळविले होते. त्याच्या नमुन्यात डार्बेपोटीन व मोर्फिन आढळून आले. पंजाबचा हरजोधवीर सिंग पाच हजार मीटर शर्यतीत पाचव्या स्थानावर होता; तर दहा हजार मीटर शर्यत तो पूर्ण करू शकला नव्हता. त्याच्याही नमुन्यात डार्बेपोटीन व मोर्फिन आढळून आले.