। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्यावर शनिवारी (दि.18) दुःखाचा डोंगर कोसळला. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. पोटच्या मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आभाळंच कोसळलं आहे.
ही घटना श्रीवर्धनमधील वेळास समुद्र किनारी घडली असून त्यांच्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाचादेखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे ऐकुन कुटूंबासह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.
सध्या उकाडा वाढला आहे. त्यामुळे संतोष पाटील यांची दोन मुले नातेवाईकासह पोहोण्यासाठी समुद्र किनारी गेले होते. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मयुरेश पाटील (23), हिमांशू पाटील (21) व अवधूत पाटील (26) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन मुलांचे निधन झाले. ही घटनाच हृदय पिळवटून टाकणारी आहे. ही घटना समजताच मन सुन्न झालं. क्षणभर पायाखालची वाळूच सरकली. हे दुःख सहन करणं खूप कठिण आहे, याची कल्पना आहे. संतोष पाटील व त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे.
चित्रलेखा पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप