नेरुळमध्ये बस थांब्यावर थरार; तरुणीवर जीवघेणा हल्ला

| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील नेरुळ येथील एका बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. तिच्या डोक्यावर बाटलीचा वार केल्यानंतर फुटलेली बाटली तिच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. यात तरुणी जबर जखमी झाली होती. तिच्यावर सध्या उपचार सुरु असून हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. हुसेन इमाम हसन शमशु असे अटक आरोपीचे नाव आहे. यातील जखमी युवतीचे नाव निशा कुंभार असे आहे.

निशा हि ऐरोलीत राहणारी असून तिची नेरुळ येथील एका महाविद्यालयात परिक्षा सुरु आहे. त्यामुळे चार तारखेला ती नेरुळ येथे आली व महाविद्यालयातील काम करुन पुन्हा घरी जाण्यासाठी जवळच्या बस थांब्यावर खुशी कदम या आपल्या मैत्रिणी समवेत थांबली.

दोघीही परीक्षा संदर्भात बोलत असताना अचानक हातात काचेची बाटली घेऊन एक व्यक्ती आला आणि त्याने निशाला मारहाण सुरु केली. निशाने प्रतिकार करताना ती बाटली फुटली. मात्र त्याच अवस्थेत फुटलेली बाटली निशाच्या पोटात खुपसण्याचा आरोपीने प्रयत्न केला. मात्र हा वार निशाने वाचवला.

या झटापटीत तिच्या कमरेला मोठी दुखापत झाली. दरम्यान, दोघेजण मदतीसाठी धावत आले. त्यामुळे आरोपी पळून गेला. नेरुळ पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ निशाला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केले असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. आरोपी याच परिसरात भीक मागणारा आहे. विक्षिप्त आणि मनोरुग्ण असल्यामुळे तो असे वागतो, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Exit mobile version