। अलिबाग । प्रतिनिधी ।
हिंदू भंडारी सेवाभावी संस्था पुरस्कृत समस्त भंडारी समाजाच्या सहकार्याने अलिबाग तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट भंडारी प्रिमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. 16) सकाळी कुरुळ येथील आझाद मैदानात मोठ्या जल्लोषात झाले.
यावेळी भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते नरहरी तोडणकर, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका संजना किर, अखिल भंडारी सेवा मंडळ पनवेलचे अध्यक्ष डॉ. दिपक खोत, राजेश शिंदे, अविनाश आचरेकर, प्रवीण पाटील, प्रमोद तोडणकर, नयना शिलदणकर, तुकाराम तोडणकर, किशोर तोडणकर, पत्रकार भारत रांजणकर, भुषण बिर्जे, विजया कुडव, साहिल पाटील, नितीन देशमुख, प्रसाद नागवेकर आदी मान्यवर, पदाधिकारी, भंडारी समाज, खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत आर. के. ब्रदर्स, स्पृहा इलेव्हन किहीम, बिर्जे ब्रदर्स कुरुळ, रायगड लिफ्ट, जय हनुमान कातळपाडा, संस्कृत इलेव्हन वाडगाव, कनगुटकर इलेव्हन कालोशी, बाबू शिलधनकर, सासवणे इलेव्हन हे आठ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनीय सामना बाबू शिलधनकर, सासवणे इलेव्हन व कनगुटकर इलेव्हन कालोशी या संघामध्ये झाला. यामध्ये सासवणे संघाने सामना जिंकला. रविवारी (दि. 17) क्रिकेटचा अंतिम सामना होणार आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाला रोख 77 हजार 777 रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 55 हजार 555 रुपये व चषक व तृतीय क्रमांकाला रोख 22 हजार 222 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, सामनावीर व मालिकावीराला आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे. ही स्पर्धा युट्यूबवर घर बसल्या पाहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली असून क्रिकेटचा थरार प्रेक्षकांसह क्रिडा प्रेमींना दोन दिवस या मैदानात पहाता येणार आहे.







