दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या
| नागोठणे | वार्ताहर |
वेळ दुपारी तीन वाजताची… नागोठण्याजवळील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीत दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केला असून, त्यांनी दोन सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून जखमी केल्याचा संदेश नागोठणे पोलीस ठाण्याला मिळाला. नागोठणे पोलिसांनीही वेळ न दवडता तातडीने रिलायन्स मटेरियल गेटमधून कंपनीत प्रवेश केला. क्युआरटी जवान, एटीएस पथक, अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका, एटीबी पथक, बीडीडीएस बॉम्ब शोधक-नाशक पथक तसेच श्वानपथकासह सशस्त्र पोलिसांचा ताफा रिलायन्स कंपनीत दाखल होऊन त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. या पथकांनी तसेच पोलिसांनी आरजीएसएस जवान व ऑफिसर्सना सोबत घेऊन तीन तास ऑपरेशन राबवले व नकली दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. मॉकड्रीलचा हा थरार नुकताच नागोठण्यातील रिलायन्स कंपनीत पहायला मिळाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष शशांक गोयल व एच.आर. हेड गौतम मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल संपन्न झाले. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी सोमवार, दि.17 रोजी दुपारी 3 वाजता ही मॉकड्रिल यशस्वीपणे राबविण्यात आली. दहशतवाद्यानी घुसखोरी केली असून, ते रिलायन्स कंपनीमध्ये घातपात करण्यासाठी लपून बसले आहेत असे समजून त्यांना शोधून काढण्याचे व त्यांना प्रत्युत्तर देण्याचे आणि सर्वसामान्य माणसाचा बचाव करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये मोठया संख्येने पोलीस दिसत असल्याने काही काळ रिलायन्स परिसरात दहशतवादी आले असल्याची अफवा पसरली होती. या ठिकाणी नेमके काय चालू आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
या मॉकड्रिल दरम्यान पत्रकार मंडळीही नक्की काय झाले हे विचारण्यासाठी तेथे आले होते. त्यांना कंपनी जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी घडणार्या घटनेची, सर्च ऑपरेशनची व बचाव कार्याची माहिती दिली. प्रत्येक मिनिटाला तेथे काहीतरी घडत होते आणि या प्रत्येक प्रसंगाची नोंद कंपनी मार्फत या मॉकड्रिलचे प्रमुख पंकज केचे हे मिनिट टू मिनिट घेत होते व कंपनी अधिकार्यांना अशावेळी काय काळजी घेता येईल हे सांगत होते. त्याप्रमाणे आदेश पाळले जात होते.
या मॉकड्रिलमध्ये कंपनीतर्फे अमित तायडे, कैलासनाथ महाडिक, प्रणव मातुरकर, रमेश धनावडे, श्रीकांत गोडबोले, गजानन पाटील, कालिका यादव, दत्तात्रेय बर्वे, डी पृथ्वी विश्वनाध, विश्वराज सावंत, आशिष चंद, सिद्धांत भूसल, कीर्तना आर, स्नेहा निकम, नागराज नंदीहल्ली, आशिष पोखरीयाल, विश्वास साळवी, विनोद अहिर, सागर मोरे, महिमा छेत्री, दरपेश दिनगर, रवींद्र पवार, बिरेंद्रा बर्णवाल, तसेच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक नारायण चव्हाण, एपीआय कदम, हे.कॉ. विनोद पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांनी तसेच रायगड जिल्हा पोलीस दलाकडून आलेल्या विविध तुकड्या व बचाव कार्यातील कमांडोसहित पोलिसांनी हे मॉकड्रिल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.