। स्पेन । वृत्तसंस्था ।
अजाक्स व पॅनाथिनाइकॉस यांच्यात युईएफए स्पर्धेत मॅरेथॉन फुटबॉल सामना पाहायला मिळाला. यावेळी अजाक्सने 13-12 अशा फरकाने हा सामना जिंकला. युरोपा लीगच्या तिसर्या पात्रता फेरीतील सामना निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतही निकाल लागला नाही. त्यामुळे पेनल्टी शूट आऊटचा खेळ रंगला होता.
मागील आठवड्यात अजाक्सने 1-0 अशा फरकाने पॅनाथिनाइकॉसवर विजय मिळवला होता. परंतु, शुक्रवारी (दि.16) झालेल्या सामन्यात त्यांनी कडवी टक्कर दिली. यावेळी हा सामना अविश्वसनीय होता, असे अजाक्सचे प्रशिक्षक फ्रान्सिस्को फारिओली म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सामना अप्रतिम होता. अशा सामन्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये जाणे कठीण असते. यास थोडा जास्त वेळ लागला असेल, परंतु आम्ही पुन्हा एक महत्त्वाचा विजय मिळवला. यावेळी डच आंतरराष्ट्रीय ब्रायन ब्रॉबीने दोन पेनल्टी चुकवले आणि अजाक्सचा गोलरक्षक रेमको पासवीरने पाच बचाव केले. अजाक्स पहिल्या हाफमध्ये 1-0 अशा आघाडीवर होते आणि टेटेच्या 89व्या मिनिटाला आलेल्या गोलने सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेतहीह ही कोंडी न सुटल्याने तब्बल 34 पेलन्टी शूटआऊटचा खेळ झाला. यावेळी अजाक्सने 13-12 अशा फरकाने हा सामना जिंकला.
2007च्या 21 वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 32 पेनल्टी शूट आऊट्स रंगल्या होत्या आणि नेदरलँड्सने 13-12 अशा फरकाने इंग्लंडला पराभूत केले होते. फुटबॉल स्पर्धेत 56 पेनल्टी शूट आऊटचा जागतिक विक्रम हा इस्रायलच्या एससी डिमोना आणि शिमशसोन टेल एव्हिव्ह यांच्या नावावर आहे.