| अलिबाग | वार्ताहर |
कोकण विभाग क्रमांक 4 च्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण व कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता कुस्तीचा मानही जेएसएम महाविद्यालयाला दिला आहे. स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (ता. 8) अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील एकूण 33 विद्यार्थी आणि 10 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यामध्ये जेएसएम महाविद्यालयाच्या शुभम म्हात्रे व श्रेयश भोळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 74 किलो व 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
रुचित भगत याने 57 किलो वजनीगटात रौप्य पदक प्राप्त केले. आयुष लाखन, ओम चेरकर व यश भगत या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे 57 किलो, 61 किलो व 65 किलो वजनीगटात कांस्य पदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. जे. एस. एम. महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली. विजयी खेळाडूंचा सत्कार जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना व क्रीडाप्रमुख डॉ. रवींद्र चिखले, प्रा. सत्यजीत तुळपुळे, प्रा. हर्षद टिवळेकर; तसेच इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेचे आयोजन केले. याप्रसंगी रायगड जिल्हा कुस्ती संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.