| शिहू | वार्ताहर |
महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रे खेचून पळून जाणाऱ्या दोन अट्टल सराईत चोरट्यांना थरारक पाठलाग करुन पकडण्यात नागोठणे पोलिसांना यश आले आहे.
तरशेत येथील माधुरी गिरीश नाईक या मंगळवारी (दि.4) दुपारी शिहू फाटा येथे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होत्या. पेझारी नागोठणे रस्त्याने शिहू बाजूकडून एका स्कूटीवरून येऊन त्यावरील एक इसम खाली उतरून त्यांना वडखळकडे जाण्याचा रस्ता कुठे आहे असे विचारण्याचा बहाणा केला. त्या बेसावध असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची चैन असे एकूण 1,68,000 रुपयांचे दागिने जबरी चोरी करून सोबत आणलेल्या स्कूटी वरून नागोठणे बाजूकडे पळून गेले आहेत, अशी बातमी नागोठणे पोलिस स्टेशन मध्ये दूरध्वनी वरून मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी तत्काळ नाकाबंदी केली. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता दोन्ही आरोपी स्कूटीवरून वडखळ बाजूकडे जात असताना दिसून आले, म्हणून तत्काळ वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांना कळवून वडखळ पोलिसांना प्राप्त फुटेज पाठविण्यात आले.
गुन्हाचे गांभीर्यओळखून वडखळ पोलिस स्टेशन येथे नाकाबंदी लावण्यात आली व तात्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला. वडखळ येथे मुंबई-गोवा हायवे रोडवर नागोठणे पोलिसांनी वडखळ पोलिसांच्या मदतीने व प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून दोन्ही आरोपी यांना चोरीच्या मुद्देमाला व स्कूटी सह ताब्यात घेतले. सदर गुन्हा घडल्या पासून आरोपींचा थरारक पाठलाग करून नागोठणे पोलिसांनी वडखळ पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी अटक केले आहेत. या बाबत नागोठणे पोलिस स्टेशन गुन्हा रजी नं. 90/2023 भा.द.वी.कलम 392, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचे कामी सहा.पोलिस निरीक्षक संदीप पोमाण, पोलिस हवालदार विनोद पाटील, पोलिस नाईक सचिन पाटील, पोलिस नाईक नितेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल रामनाथ ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल सत्यवान पिंगळे, सायबरचे पोलिस हवालदार संतोष म्हात्रे यांनी सदरची कामगिरी बजावली. या बाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रमोद कदम करीत आहेत.