वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या समीकरणात भारताला दुहेरी फायदा
| ढाका । वृत्तसंस्था ।
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (25 डिसेंबर) तीन विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. भारताच्या दुसर्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. विजयासाठी मिळालेले 145 धावांचे लक्ष्य भारताने 47 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केले.
भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक मालिका जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. मात्र, भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, असे नाही. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत, ज्यात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अंतिम शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पाचवा संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ याआधीच बाहेर पडले आहेत. याशिवाय, या विजयासह भारतीय संघाने विजयाची टक्केवारी वाढवली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन सायकलमध्ये टीम इंडियाची विजयाची टक्केवारी सध्या 58.93 टक्के आहे. गुणतालिकेत संघ दुसर्या स्थानावर आहे. भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत 76.92 टक्केने सामने जिंकले आहेत. तिसर्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 54.55टक्के आहे, तर श्रीलंका संघ 53.33 टक्केने सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा संघ क्लीन स्वीप स्विकारत असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, भारतीय संघ बांगलादेशकडून दुसरा सामना हरला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने भारताला मायभूमीत होणार्या मालिकेत पराभूत केले, तर पाकिस्तान संघ सर्वोत्तम दोन मध्ये येऊ शकतो. परंतु आता ते घडणे शक्य नाही. मात्र, पाकिस्तानचा संघ पहिल्या चारमध्ये पोहोचू शकतो.