| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अलिबाग शहरासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली होती. सदर मागणीची दखल घेत शहरासाठी 3 कोटी 50 लाख रुपये खर्चून 120 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत.
आ. जयंत पाटील यांनी 1 मार्च रोजी विधान परिषदेत अलिबाग शहर आणि परिसरातील पर्यटन दिवसेंदिवस वाढत चालले असून, खबरदारीचा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली होती. याप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत जानेवारीमध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती दिली होती.
अलिबाग नगरपरिषदेकडून अलिबाग शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टि.व्ही. व संपर्क ध्वनी यंत्रणा बसविण्याकरीता सन 2021-22 व 2022-23 मध्ये जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता, अशी माहिती शिंदे यांनी दिली. नगरपरिषदेने जिल्हा नियोजन समिती, रायगड यांचेकडे सादर करण्यात आलेले प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. तथापि, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन अलिबाग शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरीता पोलीस विभागामार्फत माहे जानेवारी मध्ये प्राथमिक सर्व्हे करण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीस सादर करण्याची कार्यवाही आहे, असे ते म्हणाले.
त्यानुसार यासाठी निधी मंजुर करुन जिल्हा नियोजन मंडळ, पोलीस प्रशास व नगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून अलिबाग शहरात सीसीटिव्ही कॅमेरे शहरभर बसविण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही नियंत्रण अलिबाग पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर नगरपालिका प्रशासन सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित व देखरेख करणार आहे.
अलिबाग शहरात येण्यासाठी असलेले सर्व प्रवेशद्वार, मुख्य चौक, बस डेपो, बाजारपेठ, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, कार्यालये यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे अलिबाग शहराचे सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षमीकरण होणार आहे.
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड पोलिसांनी अधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. याच धर्तीवर अलिबाग धर्तीवर अलिबाग शहरात सीसीटिव्ही कॅमेर्याचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या माध्यमातून अलिबाग पोलीस शहरात घडणार्या गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणार आहेत