प्रचारात स्वतःला झोकून द्या: माजी आ. बाळाराम पाटील

महाविकास आघाडीचा पनवेलमध्ये शानदार मेळावा

। पनवेल । वार्ताहर।

लढायचं आणि जिंकायचं या ईर्षेने पुढचे नऊ दिवस प्रचारात झोकून द्या, असे आवाहन शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले. येत्या 26 जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ पनवेल-उरण महाविकास आघाडीच्यावतीने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये रविवार दिनांक 16 जून रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी ते बोलत होते. आपल्या आघाडीत कुणीही लहान भाऊ नाही, कुणीही मोठा भाऊ नाही. आपण सगळे एक समान आहोत, असे प्रतिपादन पनवेल-उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील यांनी केले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील म्हणाले की, तब्बल सहा टर्म म्हणजेच 36 वर्षानंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार ही निवडणूक लढवत आहे. असे असले तरी रमेश कीर हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. पनवेलमध्ये साधारण वीस हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात 54 हजार मतदार आहेत. या मेळाव्यामध्ये मंचावर उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर. सी. घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत, माजी राजीप अध्यक्ष ए. डी. पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version