पाणीटंचाईविरोधात महाविकास आघाडीचा सिडकोवर मोर्चा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नवीन पनवेल शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडीने शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
नवीन पनवेल शहरातील अनेक इमारतींमध्ये पाणी जात नाही, पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. ऐन दिवाळीतदेखील पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, नवीन इमारतींना पाणी कुठून मिळते तसेच टँकरने शहरात पाणीपुरवठा केला जातो, मात्र नळाला पाणी येत नाही, याचा जाब सिडको अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे हा आक्रोश मोर्चा 30 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला. यावेळी भाजपाच्या नगरसेवकांचे फोन गेल्यानंतर त्यांना टँकर मिळतो, मात्र आम्हाला मिळत नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी सभापती काशिनाथ पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, मनसे प्रवक्ता योगेश चिले, बबन विश्वकर्मा, यतीन देशमुख, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, पराग मोहिते यांच्यासह अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी काही ठिकाणच्या पाईपलाईन लवकरच बदलल्या जाणार असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘सिडको प्रशासन जागे व्हा! पाणी द्या, नाहीतर खुर्ची सोडा!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान सिडकोच्या अधिकाऱ्यांशी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असता, अखेर अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी उद्यापासून पाणीपुरवठा नियमित करण्याचं आश्वासन दिलं. जर पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला, तर पुढील वेळी आम्ही केवळ मोर्चा नव्हे, तर सिडको प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा महाविकास आघाडीने दिला.







