महिला पत्रकाराला धमकावण्याचा प्रयत्न
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर 7 रावेची हाईट्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान आग लागली. यावेळी स्थानिक महिला पत्रकार आगीचे वृत्तांकन करीत असताना भाजपचा पदाधिकारी असल्याचे तिला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याच पदाधिकाऱ्याने आगीसारखी भीषण घटना असताना अग्निशमन जवानांच्या हातून पाण्याचा पाईप घेऊन फोटो आणि व्हिडोओसाठी आग विझविण्याची चमकोगिरी केल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, ही आग एवढी भयंकर होती की, अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांसहित शहर पोलीस, पालिका प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रमाने तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण आणण्याचे काम केले. या आगीमध्ये घरगुती सामान सर्व जळून खाक झाले असून, मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजूबाजूच्याही घरांचे नुकसान झाले आहे. याप्रसंगी इमारतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले असून, कोणती जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी पनवेल मधील स्थानिक महिला पत्रकार या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेल्या असता तुम्ही कोणाच्या परवानगीने चित्रकरण करत आहात, असा सवाल करत भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी महिला पत्रकारांना धमकवण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांचा मोबाईल दाखवण्यास सांगितले. आणि इथे फोटो व्हिडिओ काढू नका, असे सांगत धमकावण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाजप पदाधिकारी अमर उपाध्याय आपण नगरसेवक असल्याचे सांगत त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना पुढे करत व्हिडीओ, फोटो काढण्याची तुम्ही परवानगी घेतली का? असा प्रश्न उपस्थित करत महिला पत्रकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला. घडलेली घटना गंभीर असताना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हातून बंबाचा पाईप हाती घेऊन भाजप पदाधिकारी उपाध्याय चमकोगिरी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले असून, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हातून पाईप घेऊन चमकोगिरी करण्याचा अधिकार उपाध्याय यांना कोणी दिला, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे, तसेच महिला पत्रकारासोबत गैरवर्तन करणाऱ्या अशा महिला कार्यकर्त्यांविरोधात भाजपश्रेष्ठी कार्यवाही करतील का, असा प्रश्नदेखील सामान्य नागरिक तसेच पत्रकार उपस्थित करत आहेत.







