मुरूड पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यामध्ये शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करीत भर पोलीस ठाण्याच्या आवारात शेकाप कार्यकर्ते नरेश दिवेकर यांना मारहाण केली. मात्र मारेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई न करता, अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून या प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. यशवंत पाटील यांच्यासह अविनाश शिंदे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील आ. दळवी यांचा एक आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. तो व्हीडीओ तक्रारदार नरेश दिवेकर यांनी मुरूड जंजिरा सिटीझन फोरम या सोशल मिडीयाच्या ग्रुपवर बुधवारी सायंकाळी पाठविला होता. मुरूडमधील शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी दिवेकर यांना टारगेट करीत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी हा प्रश्न सांमजस्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या समोरच दिवेकर यांच्यावर अरेरावीची भाषा करीत तुझा न्याय आम्ही आमच्या पध्दतीने करतो अशी धमकी दिली. कायदा हातात घेऊन मुरूड नगरपरिषदेच्या एका कंटेनर खोलीमध्ये नेऊन त्यांना जबरदस्तीने माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला.दरम्यान दिवेकर यांना पोलीस ठाण्याच्या आवारातच हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुरूडमधील पोलिसांसमोर घडला. तरीदेखील मारेकऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शेकापकडून केला जात आहे. नरेश दिवेकर यांना मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या यशवंत पाटील व अविनाश शिंदे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मुरुड पोलीस व जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केली आहे. संबंधित कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांना कायद्यानेच आता योग्य धडा शिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






