गोरठण बुद्रुकमध्ये विजेचा थरार, तीन घरांवर वीज कोसळून मोठे नुकसान, जीवितहानी मात्र टळली

वावोशी | जतिन मोरे |

वावोशी भागात झालेल्या जोरदार पावसामध्ये गोरठण बुद्रुक येथील पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांच्या घरावर संध्याकाळी ६:३० ते ०७ वाजण्याच्या दरम्यान वीज कोसळली असून यामध्ये घराच्या वरच्या भागाचे पत्रे फुटून फार मोठे नुकसान झाले आहे. संसारपयोगी वस्तूंचे तसेच घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन मजली घर असलेल्या या घरातील तळमजल्यावर या कुटुंबातील लोक बसलेले असल्यामुळे या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब बालंबाल बचावलेे आहेत.
६:३० ते ०७ वाजण्याच्या दरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन या तिन्ही घरावर मोठा विजेचा लोळ पडला. हा विजेचा थरार प्रत्यक्ष दर्शी तेजस पाटील याने स्वतःच्या डोळ्याने पाहिल्याचे त्याने सांगितले आहे. अचानक रौद्र रुप धारण केलेल्या या विजेच्या कोसळल्याने घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून या तीनही घराच्या वरचा भाग पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या काही पत्रे उडून गेले आहेत तर काही पत्रे फुटून खाली कोसळले आहेत. तसेच सर्व खोली पावसाच्या पाण्याने भरून गेली. यावेळी पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांचे कुटुंबिय तळमजल्यावरील खोलीत बसले असल्याने या दुर्घटनेतून बालंबाल बचावले आहेत. सदर घटनेची माहिती पोलिस पाटील विद्याधर जाधव यांनी घेतली असून त्यांनी सदर घटनेच्या पंचनामा करिता कळविले असल्याचे सांगितले आहे.

ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून दरवाजा लावण्यासाठी वरच्या मजल्यावरील घरात आलो असता वीज चमकून डोळ्यासमोर लक्ख प्रकाश पडला आणि घरावरील पत्रे फुटले तर काही पत्रे उडून गेले तसेच विजेचा मोठा आवाज होऊन मी देखील बाजूला फेकल्यासारखा पडलो पण मला काही दुखापत झाली नाही. मी सरळ घराच्या तळमजल्यावर पळत गेलो.
तेजस पाटील – प्रत्यक्षदर्शी, गोरठण बुद्रुक

Exit mobile version