तिबोटी खंड्याचे वाचविले प्राण

। उरण । वार्ताहर ।

पनवेल मधील करंजाडे येथे कॉलेज फाट्याजवळ असलेल्या तलावात पडलेला ‘तिबोटी खंड्या’ नावाचा पक्षी आढळून आला. याला इंग्रजीत ‘ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर’ म्हणतात. केअर ऑफ नेचर या निसर्ग सेवी संस्थेचे चिंचपाडा शाखा अध्यक्ष रुपेश पाटील हे सकाळी पोहण्यासाठी तलावात गेले असता आपला जीव वाचविण्यासाठी पाण्यातून बाहेर पडण्याकरिता हालचाली करत असलेला हा असहाय पक्षी त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी या पक्षाला पाण्यातून काढून लगेचच मकेअर ऑफ नेचर महाराष्ट्र राज्यफचे संस्थापक राजू मुंबईकर यांना संपर्क करून ही माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार करून पक्षी सुस्थितीत झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी त्यांच्या निसर्ग अधिवासात मुक्त केले.

पश्‍चिम घाटात रहिवासी असलेला हा ‘तिबोटी खंड्या’ विणीच्या हंगामात रायगड जिल्ह्यात आलेला पाहायला मिळतो. ‘तिबोटी खंड्या’ या पक्षाला रायगड जिल्ह्याचा ‘जिल्हा पक्षी’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. विविध रंगाचे अतिशय विलोभनीय असं सौंदर्य प्राप्त असलेला ‘तिबोटी खंड्या’ दरवर्षी जून ते सप्टेंबर या त्याच्या विणीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोकणात घरटी करताना पाहायला मिळतो.

याच्या निरिक्षणासाठी कर्नाळा अभयारण्य हे पक्षी प्रेमींचे सर्वात पसतींच्या ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. आपल्या पिल्लांना भरविण्यासाठी जंगलातून पाली, लहान खेकडे, बेडूक आदी घेऊन येतानाच क्षण अगदी अनुभव घेण्यासारखे असतात. आणि विणीच्या अशावेळी या पौढ पक्षाला मिळालेलं हे जीवदान खूप महत्त्वाचे मानले जाते.

Exit mobile version