उरणमधील गावांना भरतीचे पाणी धोकादयक

। उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील नवघर व बोकडविरा गावांतील काही भागात समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्याने घरापर्यंत पाणी गेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वस्तूंचेही नुकसान झाले आहे. मोसमी पावसाच्या पूर्वीच गावात पाणी शिरल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे. त्यामुळे भविष्यात होणार्‍या जोरदार पावसामुळे उरणमधील गावांना पाणी शिरण्याचे संकेत मिळाले आहेत.

उरण तालुक्यात समुद्राच्या भरतीचे पाणी ये-जा करणार्‍या नैसर्गिक वाटा मातीचा भराव टाकून बंद करण्यात आल्या आहेत. आजही काही प्रमाणात नाले बुजवून भराव केला जात आहे. त्यामुळे भरतीचे पाणी गावात शिरू लागले आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने गावातील घरांचे व वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असताना या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते आहे. समुद्र आणि पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, या करिता सिडकोकडून कोट्यवधी रुपयांचा निधी वापरला जात असूनही घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत. सिडको प्रशासन आणि अधिकारी काम होत असल्याचा दावा करीत असले तरी पावसाळा सुरुवात होण्यापूर्वीच गावात पाणी शिरू लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version