| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील (जि. रायगड) खारेपाटातील शहापूर गावात समुद्राचे उधाणाचे भरतीचे खारे पाणी शिरल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यासाठी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, तसेच या ठिकामी कायमस्वरुपी सिमेंटचा उंच बंधारा बांधावा, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहात केली.
शहापूर गावात दि.25-12-2022 रोजी पहाटे 3 वा. च्या सुमारास समुद्राच्या उधाणाच्या भरती पाणी गावात शिरून 22 ग्रामस्थ शेतकर्यांच्या घरात शिरून आर्थिक नुकासान झालेले आहे. तसेच सुमारे 300 एकर भातशेती क्षेत्रात समुद्राचे भरतीचे खारेपाणी शिरले आहे. तसेच मागील वर्षीही उधाणाच्या भरतीच्या तडाख्याने शहापूर येथील समुद्र संरक्षक बंधान्याला मोठे भगदाड (खांड) पडल्याने भरतीचे पाणी गावात तसेच शेतीमध्ये शिरून नुकसान झाले होते.असे त्यानी निदर्शनास आणले.
सततच्या समुद्राच्या उधाणाच्या भरतीचे पाणी गावात तसेच शेतात शिरल्याने शेतजमीन नापीक होत असल्यामुळे भातशेती पत निकृष्ट दर्जाची झाल्याने भातशेतीची लागवड करता येत नसल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान भरपाईला सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटीकरणचा उंच असा बंधारा बांधण्यात यावा, यासाठी मी शासनाचे या महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधून विशेष उल्लेखाद्वारे मागणी करीत आहे.असे ते म्हणाले.