महाड मतदारसंघात काटेरी टक्कर

। महाड । वार्ताहर ।

संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या महाड विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत सुमारे 70 टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांची लढत महाविकास आघाडीच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या सोबत असून ही लढत काटे की टक्कर ठरेल, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.

महाड पोलादपूर व माणगाव येथे विशेष करून महिलांनी बुधवार (दि.20) सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. दुपारी बारा ते दोन दरम्यान मतदानाशी आकडेवारी घसरली असली तरीही दुपारनंतर झालेल्या मोठ्या मतदानाने हा आकडा सुमारे 70 टक्केपर्यंत पोहोचला. महाडमध्ये नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उमेदवारांनी नागरिकांना धन्यवाद दिले आहेत.

यावेळी सर्व मतदार केंद्रांवर मतदान शांततेत व व्यवस्थित संपन्न झाले आहे. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता ईव्हीएम मशीन योग्य पद्धतीने कार्यरत राहिल्यानेच मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न झाल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये आ. भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांनी उभे केलेले आव्हान आता मतपेटीमध्ये बंद झाले असून या संदर्भातील निकाल शनिवारी (दि.23) जनतेसमोर उघडला जाणार आहे. दरम्यान, बुधवार (दि.20) सकाळी महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी यांनी शाळा क्रमांक 5 येथे कुटुंबासमवेत मतदान केले.

Exit mobile version