चौथ्या टप्प्यातील सोमवारी मतदान
| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहे. दरम्यान, याआधी पहिल्या तीन टप्प्यांत झालेल्या मतदानास मतदारांचा कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून आला आहे. त्यामुळे सत्ताधार्यांसह विरोधकही चिंतेत आहेत. यामुळे निदान चौथ्या टप्प्यात तरी जास्त प्रमाणात मतदान होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात मावळमध्ये संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट) विरुद्ध श्रीरंग बारणे (शिंदे गट), बीडमध्ये बजरंग सोनावणे (शरद पवार गट) विरुद्ध पंकजा मुंडे (भाजप), शिरुरमध्ये अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव (अजित पवार गट), छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट), संदिपान भुमरे (शिंदे गट) आणि इम्तियाज जलील (एआयएमआयएम) यांच्यात तिरंगी लढत, जालनामध्ये कल्याण काळे (काँग्रेस) विरुद्ध रावसाहेब दानवे (भाजप), नगरमध्ये निलेश लंके (शरद पवार गट) विरुद्ध सुजय विखे-पाटील (भाजप), शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे (ठाकरे गट), सदाशिव लोखंडे (शिंदे गट), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी) यांच्यात तिरंगी लढत, तर रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील (शरद पवार गट) विरुद्ध रक्षा खडसे (भाजप), पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर (काँग्रेस), मुरलीधर मोहोळ (भाजपा) आणि वसंत मोरे (वंचित) यांच्यात तिरंगी लढत, असा सामना पाहायला मिळणार आहे.
पंकजा, कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला राज्यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत. महायुतीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी या मतदारसंघात सभांचा धडाका लावला. तर, महाविकास आघाडीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळली.
पुण्यात मोहोळ, धंगेकर आणि मोरेंमध्ये प्रमुख लढत पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत.
आनंद बाबू सर्वात गरीब उमेदवार दिुसरीकडं सर्वात गरीब उमेदवार आंध्र प्रदेशातील अपक्ष उमेदवार कट्टा आनंद बाबू आहेत, ज्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती फक्त 7 रुपये असल्याचे घोषित केले आहे. एडीआरच्या अहवालानुसार, कट्टा आनंद बाबू यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे फक्त 7 रुपये आहेत. आनंद बाबू आंध्र प्रदेशातील बापटला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसच्या 61 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांची संपत्ती 50 कोटींहून अधिक आहे. सुमारे आठ टक्के लोकांकडे एक कोटी रुपयांपेक्षा कमी संपत्ती आहे. दुसरीकडे, 19 सपा उमेदवारांपैकी 8 उमेदवारांकडे 1 कोटी ते 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे. युवाजन श्रमिका रयथू काँग्रेस पक्षाच्या 25 उमेदवारांपैकी फक्त एका उमेदवाराची संपत्ती 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, तर सहा उमेदवार आहेत ज्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1,710 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील होणार आहे.