टिळकांचे विचार देशाला प्रेरणादायी- मोदी

लोकमान्य पुरस्काराचे वितरण

| पुणे | प्रतिनिधी |

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचे मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं. आज देशाला लोकमान्यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे प्रशंसोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी( 1 ऑगस्ट) पुणे येथे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने मलोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारफ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही. शिवाय पुरस्कारासाठी जी एक लाखाची रक्कम मिळाली आहे ती नमामि गंगे या प्रकल्पाला अर्पण करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. टिळकांनी सुरु केेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती आदी उत्सवाचाही त्यांनी उल्लेख केला. दगडूशेठ पहिले व्यक्ती होते ज्यांनी टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केल्याचाही उल्लेख मोदींनी केला.

पवारांकडून मोदींचे कौतुक
याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेकांची नावं घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश झाला याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आणि देशाला आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी जी निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख केला. शिवछत्रपतींचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं ते रयतेचं राज्य होतं. ते रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याच्या गौरवाचा एक भाग आहे. असे प्रशंसोद्रारही त्यांनी काढले. त्याचबरोबर शाहिस्तेखानाला पळवण्यासाठी शिवरायांनी पहिला सर्जिकल स्ट्राईक केला होता याची आठवणही सांगितली. अलिकडच्या काळात या देशातल्या जवानांना देशाचं रक्षण करण्यासाठी साठी सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही.असे ते म्हणाले.

गो बॅक मोदी…
मणिपूरमधील हिंसाचारावरुन पुण्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी मोदींच्या पुणे दौर्‍याला विरोध केला. विशेष करुन मोदी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी आले असताना विरोधकांनी गो बॅक मोदी अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. या कार्यक्रमात शरद पवारांनी सहभागी होऊ नये, असे आवाहनही करण्यात आले होते. तरीही पवार उपस्थित राहिले. यावरुनही संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version