प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांची माघार
। सिंधुदुर्ग । वार्ताहर ।
तिलारी घाट मार्गे वाहतुकीस प्रतिबंध घातलेल्या एसटी बसची सेवा सुरू करावी, अशी मागणी करून देखील कोल्हापूर प्रशासन कानाडोळा करीत असल्याने आज स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिलारी कोदाळी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी प्रांताधिकारी यांच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे घेतले. येत्या दोन दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी सकारात्मकता गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ कलबांडे यांनी दर्शविली.कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी पावसाळ्यात उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी घाट मार्गे अवजड वाहनांना बंदी घातली.
त्यामुळे एसटी बसला देखील या मार्गाने वाहतूक करण्यास प्रतिबंध पडला. तेव्हापासून या मार्गाने धावणारी बस सेवा बंद आहे. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या एसटी बसमुळे स्थानिकांचे हाल झाले. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, वृध्द व कामानिमित्त प्रवास करणार्यांची ससेहोलपट झाली. त्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तिलारी घाटातून बस सेवा सुरु करण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. म्हणून येथील स्थानिकांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रांत व संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांना घाट रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गडहिंग्लज प्रांताधिकारी एकनाथ कलबांडे सोबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, आरटिओ विभागाचे अधिकारी यांनी आठ दिवसांपुर्वी प्रात्यक्षिक घेतले होते. मात्र, एसटी बस चालु करण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज सकाळी साडे दहा वाजण्याच्य सुमारास तिलारी घाटाच्या माथ्यावर कोदाळी येथे स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी चंदगड पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मात्र, महसूल प्रशासन अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. शेवटी प्रांताधिकारी कार्यालयातून प्रतिनिधी उपस्थित राहिला. आंदोलनकर्त्यांची समजुत काढत प्रांताधिकारी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांनी आपल्या कार्यालयात भेटण्याची विनंत केली. त्या विनंतीला मान देऊन आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधींनी गडहिंग्लज येथील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान येत्या दोन दिवसात फेर अहवाल करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणार आहे. त्यामुळे तुर्तास रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी एसटी बस चालू करण्यासाठी दर्शविलेली सकारात्मकतेमुळे रास्ता रोको आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.