। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथिल नारळ पाणी विक्रेते शरद मयेकर त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी (दि.27)सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. समुद्रकिनारी पती पत्नीच्या नारळ पाणी, भेळपुरी विक्रीच्या व्यवसायाला सरपंच आणि ग्रामसेवक हे व्यवसाय करण्यास मनाई करत असल्यामुळे मयेकर दाम्पत्यांने उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी प्रशासनाला दिलेल्या पत्रकाद्वारे त्यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हे देखील समोर आणले आहे. तरीही जिल्हा प्रशासन सुस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मालगुंड येथील शरद अशोक मयेकर हे सुमारे 20 वर्षापासून गणपतीपुळे समुद्रकिनारी नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. मात्र, हा व्यवसाय करण्यास गणपतीपुळे ग्रामपंचायतीने मनाई केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीने कोणत्या आधारे व्यवसाय नाकारला याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच, शरद यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतला कर देखील भरला आहे. तरी, दि. 2 डिसेंबर रोजी त्यांची पत्नी आदिती ही व्यवसाय चालवण्याची परवानगी मागण्याकरिता गेली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी तिला उडवा-उडवीची उत्तरे दिली आहेत.
तात्काळ कारवाईसह बदलीची मागणी
गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून होणार्या जाणीवपूर्वक त्रासाबद्दल ग्रामसेवक चौधरी व सरपंच कल्पना पकले हे पैशाची मागणी करत असल्यामुळे आता जगणे मुश्किल झाले आहे. तरी, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ कारवाई होऊन ग्रामसेवकांची बदली व्हावी. अशी थेट मागणी प्रशासनाकडे लेखी पत्रकातून करण्यात आली आहे. यासोबत, गणपतीपुळे ग्रामपंचायत यांच्यावर यापूर्वी मालगुंड येथील रहिवासी प्रनेश मयेकर यांनी न्यायालयात केस दाखल केलेली आहे.
अनेकांचे प्राण वाचवलेत
गणपतीपुळे येथे येणारे भाविक समुद्रात पोहण्यासाठी जात असतात. मात्र, पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने बुडण्याचे प्रसंग यापूर्वी अनेक वेळेला घडले आहेत. परंतु, उपोषणकर्ते मयेकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एक जागरूक नागरिक या नात्याने अनेकांचे प्राण वाचविले आहे. आजपर्यंत त्यांनी सुमारे 39 पर्यटकांचे प्राण वाचविले आहेत. या कौतुकास्पद कामगिरीचे जिल्हा दंडाधिकारी साहेब रत्नागिरी व जिल्हा पोलीस प्रशासन रत्नागिरी यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरविण्यात आले आहे. मात्र, मयेकर यांच्यावर आज व्यवसायासंबधित उपोषणाची वेळ आली आहे.