। मुंबई । प्रतिनिधी ।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण चव्हाट्यावर आले आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्याबरोबर ही घटना घडली आहे. यामध्ये फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर हल्लाबोल होत आहे.
विरोधी पक्षासह सत्तेतील सहकारी पक्षाकडूनही त्यांच्यावर आरोप होत आहेत. सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या बीडमधील मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांनी केला. तर बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने देण्यात आल्याचाही आरोप झाला आहे. विना परवाना शस्त्र हवेत झळकावत फायरिंगचे व्हिडिओ आणि रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सर्वांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
बीडमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेवून आहेत. बीड जिल्ह्यात 1222 शस्त्र परवाने आहेत. याशिवाय बेकायदा शस्त्र बाळगणार्यांची संख्या वेगळी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. दमानिया यांनी विना परवाना शस्त्र बाळगणार्यांचे व्हिडिओ बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना पाठवले होते. त्यानंतर दोन जणांवर कारवाई करत त्यांना अटक देखील झाली. दरम्यान, दोन दिवसांत त्यांना जामीनही मंजूर झाला.