जांभुळवाडीत ‌‘जलजीवन’चे तीनतेरा

ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमधील जांभुळवाडीतील स्थानिक आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तेथे सुरू असलेल्या जलजीवन योजनेमधून राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तर, शासनाने जांभुळवाडीसाठी तात्काळ शासकीय टँकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

75 घरांची वस्ती असलेली जांभुळवाडी ही आदिवासी वाडी दुर्गम भागात वसली आहे. येथील महिलांना पिण्याचे पाणी वाहून नेण्यासाठी डोंगर उतरुन त्यानंतर दोन ते तीन हंडे भरून पाणी डोंगर चढून न्यावे लागते. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविली जात आहे. जांभुळवाडीच्या पायथ्याशी नाल्यावर विहीर बांधली गेली असून, वाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र, वाडीमध्ये घरोघरी पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने वाडीमधील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी नवीन विहिरीमधील पाणी वाडीमध्ये असलेल्या प्लास्टिक पाण्याच्या टाकीत आणून टाकले. मात्र, नळपाणी योजनेची विहिरीमध्ये बांधकाम करताना पडलेले सिमेंट, दगड, खडी यांची स्वच्छता न करता थेट विहिरीमधील पाणी पिण्यासाठी पाठवले जात आहे, असे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी ते दूषित पाणी पिण्यासाठी वापरत नाही. तरी, ती विहीर आधी सर्व पाणी बाहेर काढून स्वच्छ करावी आणि नंतरच पाणी वाडीमध्ये सोडावे, अशी मागणी ग्रामस्थ लक्ष्मण पारधी यांनी केली आहे.

विहिरीमधील दूषित पाणी वाडीमध्ये पिण्यासाठी सोडले जात असल्याने ते पाणी प्यायल्याने काही ग्रामस्थांना अतिसारची लागण झाली होती. दूषित पाणी पिण्यासाठी पाठवले जात असल्याने शेवटी आदिवासी ग्रामस्थांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. एका पिकअपमधून पाणी विकण्यासाठी आणले जाते. ते पाणी प्रति 200 लीटर बॅरलसाठी 100 रुपये आकारले जात आहेत. तर वाडीमध्ये लग्नकार्य असेल तर पाण्याचे टँकर आणावे लागतात. या वाडीमध्ये एका व्यक्तीकडे खासगी बोअरवेल आहे. मात्र, त्यांच्याकडे बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली. बोअरवेल असलेले ग्रामस्थ हे मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्व ग्रामस्थांनी पिण्यासाठी प्रत्येकी दोन हांडे पाणी देत होते. मात्र, आता त्यांना पाणी पुरत नाही, त्यामुळे शासनाने आमच्या वाडीसाठी शासनाचा टँकर सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे. त्यासाठी जांभुळ वाडी ग्रामस्थांनी अर्ज दिला असून, त्या अर्जावर लक्ष्मण पारधी, दत्ता पारधी, बुधाजी केवारी, यशवंत केवारी, जयराम पिरकड, चंद्रकांत केवारी, पद्मा केवारी, धाई केवारी, भीमा पारधी, लहू पारधी आदींसह अन्य सर्व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Exit mobile version