आंबेवाडीत ‌‘तिरडी यात्रा’ आंदोलन

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडले असून, लोकनेत्यांकडून दरवर्षी नवीन तारीख, नवीन डेडलाईन, देण्यात येते. परंतु, महामार्गाचे काम काही पूर्ण होत नाही. या अपूर्ण कामामुळे असंख्य अपघात, मृत्यु व ढिलाई याची अखंड मालिका सुरु आहे. यामुळे आजवर साडेचार हजारहुन अधिक जणांना जिव गमवाया लागला आहे. तरी ही जबाबदारांवर कारवाई झालेली नाही. त्यासाठी कोकणकरांनी एकत्र येऊन तिरडी यात्रा आंदोलन सुरु केले आहे. आंबेवाडी नाक्यावर रविवारी (दि.7) सकाळी ही ‌‘तिरडी यात्रा’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी या तिरडी यात्रा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी लोणेरे ते कोलेटीपर्यंत तिरडी यात्रेच्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून हे आंदोलन कोलेटी ते संगमेश्वरपर्यंत 11 जानेवारीपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गाचे तटस्थ, पारदर्श, प्रभावी परीक्षण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. तसेच, या समितीमध्ये जनआक्रोश समितीचे 4 सदस्य समाविष्ट करावे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विलंब आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी. महामार्गाच्या कामासाठी स्पष्ट व अंतिम मुद्दत जाहीर करून तिचे काटेकोर पालन करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करावी. त्याचबरोबर अपघातग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी. महामार्गावर चोवीस तास सुसज्ज ट्रामा केअर सेंटर उभारावे. महामार्गांवर नष्ट झालेल्या झाडांची भरपाई म्हणून वृक्षरोपण करावे, त्याचे जतन व पोषण सरकारकडे द्यावे, अशा मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version