दुरवस्थेच्या निषेधार्थ 15 ऑगस्टला उपोषण; जन आक्रोश समिती, चाकरमान्यांचा इशारा
| महाड | प्रतिनिधी |
मागील 17 वर्षे अर्धवट अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची चालू वर्षीदेखील पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी झाली असल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश समिती व कोकणातल्या चाकरमान्यांमार्फत 15 ऑगस्ट रोजी माणगावमध्ये तिरडी यात्रेद्वारे निषेध नोंदवून आमरण उपोषणास प्रारंभ होणार असल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावरून कोकणातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या अर्धवट अवस्थेतील कामाला आज 17 वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र, तरीदेखील महामार्गाचे काम पूर्णत्वास गेले नाही. उलट, दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यात गेल्याचा इतिहास पाहण्यास मिळत आहे. याबाबत कोकणातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदत असून, येत्या 15 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जन आक्रोश समितीमार्फत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी होम हवन यज्ञदेखील करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील केंद्र व राज्य सरकारचे डोळे उघडत नसल्याने अखेर जन आक्रोश समितीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माणगाव एसटी डेपो ते तहसील कार्यालय अशी तिरडी यात्रा काढून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याने कोकणातील राज्यकर्त्यांची निष्क्रियता यानिमित्ताने दिसण्यास प्रारंभ होणार आहे. या आंदोलनाला कोकणातील किमान दहा हजार चाकरमान्यांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील महत्त्वाच्या असणार्या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कोकणातील जनतेने आवाज उठवूनदेखील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले होते. मात्र, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला नसला तरी ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम कोकणातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. त्यामुळेच की काय, सत्ताधारी लोकप्रतिनिधी महामार्गाच्या पडलेल्या खड्ड्यांबाबत आत्ताच जागरूक झाले असले तरी 17 वर्षे या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोकणातील जनता पर्यायाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग का पत्करला नाही, याबाबत जनता येणार्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारणार आहे. त्यामुळे महामार्गाच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चित्र रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावरून कोकणातील राजकीय वातावरण गणेशोत्सव काळापासून तापण्यास सुरुवात होणार एवढे मात्र नक्की.