शासकीय विश्रामगृहाजवळील ट्रान्स्फॉर्मरची डीपी उघडी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील महावितरणच्या गलथान कारभाराची कहाणी सुरूच आहे. शहरामध्ये कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने नेहमीच वीजपुरवठा खंडित होत असतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो परत केव्हा सुरू होईल याबाबत कोणतीही शाश्वती नसते. आता तर नवीनच प्रकार समोर आला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपीला कोणत्याही प्रकारचा संरक्षक दरवाजा नसल्याचे दिसून येत आहे. हा डीपी पूर्णपणे उघडा असून, त्या ठिकाणी फ्युजदेखील टाकलेले नाहीत. फ्युजच्या ऐवजी डायरेक्ट तारा वापरून वीजपुरवठा चालू केलेला आहे.
याठिकाणी नागरिकांची व पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणाचे स्थानिक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी या परिसरातून फिरत असतात. तर अनेक वेळा पर्यटक आल्यानंतर पर्यटकदेखील या ठिकाणाहून ये-जा करत असतात. मात्र, या उघड्या डीपीला कुणाचा जरी हात लागला किंवा धक्का लागला, तरी तो माणूस शॉक लागून दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे समुद्रकिनारी गुरेदेखील चरण्यासाठी जात असतात. या गुरांचेदेखील त्या ठिकाणी तोंड किंवा शेपटी लागली तरीदेखील गुरे मरण्याची शक्यता आहे.
महावितरणची मुख्य अडचण आहे की, या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचार्यांची संख्या अत्यंत कमी आहे. ठेकेदारी तत्त्वावर घेतलेले वायरमन व लाईनमन जास्त असल्याने त्यांच्याकडून अशा कामांची देखभाल योग्य वेळी केली जात नाही. या उघड्या डीपीमुळे जर कोणती जीवितहानी घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तरी महावितरणच्या अधिकार्यांनी सदर डीपीला त्वरित दार बसवून घ्यावे व त्या ठिकाणी होणारे अपघात टाळावे, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.