| महाड | वार्ताहर |
राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रायगडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीने शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या तरुणीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासोबत लांब फिरायला येशील का?, असे म्हणत या तरुणाने तरुणीचा विनयभंग केला. या त्रासाला कंटाळून या तरुणीने हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे अशी माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सूत्रांनी दिली आहे. तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संदिप काशिनाथ चव्हाण, रोहिदास काशिनाथ चव्हाण यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. महाड एमआयडीसी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या दोन्ही संशयित आरोपीविरोधात विनयभंग करणे, प्रेमाचा दबाव टाकून मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे अश्लील हावभाव करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे आर. व्ही. जाधव करत आहेत. या तरुणीने आमच्या विरोधात खोटी तक्रार दिली असून ती मनोदुर्बल असल्या कारणाने आमची खोटी नावे यामध्ये गोवली गेली आहेत. अशा स्वरूपाचा युक्तिवाद संशयित आरोपींच्यावतीने महाड न्यायालयात करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.