| पांचगणी | प्रतिनिधी |
पांचगणी व्यायाम मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे दोन्ही अंतिम सामने अखेरच्या चढाईपर्यंत रंगतदार ठरले. मुंबईच्या भारत पेट्रोलियमने मुंबईच्याच बँक ऑफ बडोदाला 29-27 अशी धूळ चारून निमंत्रितांच्या व्यावसायिक पुरुष गटाचे जेतेपदाचा गंगूबाई शिंदे स्मृतिचषक आणि 75 हजार रुपये रोख बक्षीस पटकावले. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला 32-29 असे हरवून गंगूबाई शिंदे स्मृतिचषक आणि 45 हजार रुपये रोख बक्षिसाचा मान मिळवला. शिवशक्तीचे हे हंगामातील पाचवे विजेतेपद ठरले.
![](http://krushival.in/grygrars/2023/01/IMG-20230116-WA0054.jpg)
त्याआधी, पुरुषांच्या उपांत्य लढतींमध्ये भारत पेट्रोलियमने मुंबई बंदर संघाला 28-18 असे नामोहरम केले, तर रंगतदार उपांत्य सामन्यात बँक ऑफ बडोदाने पुण्याच्या इन्कम टॅक्स संघाचा 32-29 असा पराभव केला. महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने डॉ. शिरोडकर संघाचा 41-27 असा, तर शिवशक्ती महिला संघाने स्वराज्य संघाला 37-16 असे हरवले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अॅड. गणेश गोळे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, जावली सहकारी बँकचे चेअरमन विक्रम भिलारे, युवानेते प्रकाश गोळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे उपस्थित होते.