भारताला सुपरपावर बनवणार : राजनाथ सिंह

। पुणे । वृत्तसंस्था ।
जगभरात भारताला सुपर पावर बनवण्यासाठी अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला पाहिजे. यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) शास्त्रज्ञ सातत्याने कार्य करत आहेत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

राजनाथ सिंह हे सध्या पुणे दौर्‍यावर असून, येथील विविध संरक्षण संस्थांना भेट देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी (डीआयएटी) या संस्थेला भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी, डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी.पी. रामनारायणन आदी उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, लष्कराशी संबंधित वेगवेगळ्या संस्थातील शास्त्रज्ञांचे काम, क्षमता पाहता संरक्षणमंत्री असल्याचा अभिमान वाटतो. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला खासगी उद्योगाच्या सहाय्याने उत्पादन क्षेत्रात ही प्रगती होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूरमध्ये नुकतेच एका खासगी उद्योगाने पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल एक लाख हँड ग्रेनेडतयार करून लष्कराला सुपूर्द केले आहे. इतकंच नाही तर परदेशातही याची निर्यात केली जात आहे. अशाच प्रकारे तंत्रज्ञानात आपण आघाडी मिळवली तर जगात भारत महासत्ता बनू शकते. त्यादृष्टीने जग आपल्याकडे पाहत आहे.


कोरोनाकाळात डीआयएटीने समाज उपयोगी तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे नऊ पेटंट या संस्थेकडे आहेत व हे तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डीप ओशन एक्सप्लोरेशन सारख्या क्षेत्रात ही संस्था संशोधन करत आहे. त्यामुळे येत्या काळात देशाततील आघाडीची संस्था म्हणून डीआयएटीची ओळख निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version