| पुणे | प्रतिनिधी |
आज पुण्यातील मोदीबाग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार तब्बल एक तास होत्या.
शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यातील या भेटीमुळे राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. “सुनेत्रा पवार मोदीबागेत गेल्या होत्या हे खरे असले तरी त्या शरद पवार यांना भेटल्या आहेत, की नाही याबाबत निश्चित माहिती नाही. जरी त्या शरद पवार यांना भेटल्या असल्या तरी यामध्ये ही कौटुंबिक भेट असू शकते याचे राजकीय अर्थ काढता येणार नाही. कारण सुनेत्रा पवार जरी राज्यसभा खासदार असल्या तरी पक्षाच्यावतीने राजकीय चर्चा करण्याइतकी राजकीय प्रगल्भता त्यांच्याकडे अजून नाही. आणि पक्ष त्यांच्याकडे अशी काही जबाबदारी देईल असे वाटत नाही. या प्रकरणावर पुढे बोलताना विजय चोरमारे म्हणाले, “दुसरी गोष्ट अशी की शरद पवार, पवार कुटुंबातील वडिलधारे गृहस्थ असल्यामुळे त्यांची आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली असेल तर ती कौटुंबिक भावनेतून झाली असणार आहे. म्हणून या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण असू शकेल असे वाटत नाही. “दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली होती. आणि आज सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला गेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही भेटींचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
भेटीचे खरे कारण समोर
शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा होत असली तरी, पवार यांची बहीण रुग्णालयात आहेत. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे त्यांना भेटायला गेले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या बहिणीबरोबर सुनेत्रा पवार देखील आहेत. त्यामुळे या भेटीला कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.





