अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असून, गावागावात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ग्राम सुरक्षा दल व विलगिकरण कक्ष स्थापन करण्यासह, सामुहिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी (ता. 10) सर्व खातेप्रमुख व पंचायत समितींच्या ऑनलाईन आढावा बैठकीत दिल्या.
रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. 100 टक्के लसीकरण उद्दिष्ट साध्य होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.असेही बैठकीत डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
मास्कचा वापर न करणार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात. विलागिकरण नियमांचे काटेकोर पालन करावे.
डॉ. किरण पाटील,सीईओ,जि.प.
यावेळी महा आवास अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्यासह इतर विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. किरण पाटील यांनी संबंधितांना दिल्या. या बैठकीत सर्व खातेप्रमुख, पंचायत समिती गट विकास अधिकारी सहभागी झाले होते.
कोरोना रोखण्यासाठी सतर्कता बाळगा -टोपे
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन ते तीन दिवसांपासून 40 हजारांच्यावर रुग्ण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी पुन्हा सतर्कता बाळगळ्याचे आवाहन केले आहे. तसेच दिसालाही दिला आहे. राज्यात 1.73 लाख अॅक्टिव्ह रुग्ण असले तरीही केवळ 1 टक्का आयसीयूमध्ये आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
पोलीस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पोलिस दलात देखील कोरोनाबाधित होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना देखील कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिस दलातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुण्यात गेल्या आठ दिवसात 232 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे.