फणसडोंगरीतील घरांना धोका ठरणारे काम थांबविणार; मुख्याधिकार्‍यांची माहिती

| पेण | प्रतिनिधी |
पेण फणसडोंगरी येथील सुरु असलेले काम जर तेथील निवासी घरांना धोकादायक ठरणारे असेल तर ते थांबविले जाईल,अशी माहिती पेण पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यानी दिली आहे. तर या बांधकामामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने संबंधित बिल्डर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू यांनी केली आहे.

संपूणर्र् डोंगर जेसीबीच्या सहाय्याने उन्हाळ्यात खोदले असून त्यावेळीच येथील रहिवाशांनी आमच्या घरांना धोका होऊ शकतो. अशी तक्रार केली होती. परंतु, स्थानिक रहिवाशांकडे स्थानिक प्रशासन व महसूल खात्याने दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळयात खोदकाम केलेल्या जमिनीत पाणी मुरुन जमीन डोंगराच्या उताराच्या दिशेने खचू लागली. त्यामुळे, कळत नकळत त्याचा परिणाम खोदकामाच्या बाजुला असणार्‍या घरांवर झाला असून, तेथील घरांना तडे जायला सुरुवात झाली आहे. सुरेश माळी यांच्या स्वंयपाकाची खोली उताराच्या बाजुने सरकली आहे. एक दिवसापूर्वी छोटयाश्या गेलेल्या भेगेचे रुपांतर तीन ते चार इंचाच्या भेगेत झालेले आहे. तर भिंतीतून आरपार बाहेरचे दिसत आहे. अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू यांनी केली आहे.हे बांधकाम रॉयल्स ग्रुपच्या श्री.साई डेव्हलपर्सच्यावतीने केले जात असल्याची माहिती मिळते,असेही कडू यांनी सांगितले आहे.

सदरील घटनेचा पेण तलाठी सुरेंद्र ठाकूर यांनी पंचनामा केला तसेच नगरपालिकेचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांनी देखील पूर्ण घराची पहाणी केली. त्यानंतर बनसोडे यांनी सुरेश माळी यांना संबंधिताविरुद्ध विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आपल्याला नुकसान भरपाई पण देण्याचा प्रयत्न करु असे सांगण्यात आले होते. परंतु, पाच दिवस उलटून गेली तरी देखील कोणतीच कारवाई केली नाही. मात्र, बिल्डरने पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने खोदकामस सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी भयभीत झाले आहेत. वेळेस या बिल्डरला नगरपालिकेने आवर न घातल्यास आम्ही पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करु. अशी प्रतिक्रिया भूषण कडू यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

भुषण कडू यांनी सांगितले की, महसूल खात्याने डोंगराची खोदाई करुन महसूल खात्याचे लाखों रुपयांचे नुकसान केलेले आहे. सीटी सर्व्हे नं. वेगवेगळे असून देखील माती व दगड उत्खननावर एक रुपयाची सुद्धा रॉयल्टी लावली नाही. स्थानिकांचा विरोध असताना खोदाई करून स्थानिकांचा जीव धोक्यात टाकला आहे.असा आरोपही कडू यांनी केला आहे.

सुरेश माळी यांचे घर खोदाईच्या खालच्या दिशेने घसरु लागले आहे. तर, नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय देखील खोदाईच्या बाजून सरकू लागल्याने स्थानिक रहिवाशी या शौचालयास जाण्यास घाबरु लागले आहेत. त्यामुळे मनमानेल तसे खोदाई करणार्‍या बिल्डर्स विरुद्ध नगरपालिकेने त्वरीत गुन्हे नोंदवावेत अन्यथा फणसडोंगरीच्या रहिवाशांना घेउन आम्ही नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करु. असा इशाराही कडू यांनी दिला आहे.

बिल्डरची उडवाउडवी
दरम्यान फणसडोंगरी येथे बॅनरवर असलेल्या फोन नंबरवर मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. प्रतिमा पाटील नामक महिलेने फोन उचलला आणि विचारणा केली असता त्यांनी जिघ्नेश पटेल नामक व्यक्तीचा फोन नंबर दिला. त्यांना दातार आळीतील डोंगर खोदाई व सुरु असलेल्या कामाबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ती साईट माझा छोटा भाऊ पाहतो. त्याला विचारुन पाच मिनिटात मी सांगतो. जवळपास अर्धातास होउन गेला तरी जिघ्नेश पटेल यांचा समोरुन फोन आला नाही. तर आमच्या प्रतिनिधीनी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

मुख्याधिकार्‍यांचे आश्‍वासन
फणसडोंगरीच्या रहिवाशांचा सुरक्षतेचा विचार न करता जेसीबी सुरु केले असल्याचे भूषण कडू यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर कृषीवलने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी दूरध्वनी वरुन संपर्क केला असता, त्यांनी त्वरित काम बंद केले जाईल असे सांगितले. व सोमवारी संबंधीत बिल्डर व फणसडोंगरीवाशीयांना बोलावून योग्य ती उपाययोजना केली जाईल असे सांगितले.

Exit mobile version