लालपरी चाकरमान्यांच्या दिमतीला

होलिकोत्सावासाठी रायगमधून 34 ज्यादा बसेस

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गणेशोत्सवानंतर कोकणात होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, डोंबिवली, कल्याण, ठाणे, पालघरमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त असणारे चाकरमानी होळीची सुट्टी घेऊन गावी जातात. ग्रामस्थ, कुटुंबियांसमवेत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

यंदा रविवार (दि.24) मार्च रोजी होळी दहन व सोमवार (दि.25) मार्च रोजी धुळवड सण आहे. यानिमित्ताने चाकरमानी गावी जाण्याची तयारी सुरु झाली आहे. काहीजण खासगी वाहनाने, तर काही जण एसटी बसमधून गावी येणार आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच त्यांना रायगडसह कोकणात वेळेवर पोहोचता यावे यासाठी रायगडची लालपरी त्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

एसटी महामंडळ रायगड विभागाने होलिकोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर 34 ज्यादा बसेसची व्यवस्था केली आहे. मुंबई, ठाणे, नालासोपारा येथून 18 बसेस रायगड जिल्ह्यात येणार आहेत. त्यामध्ये बोरीवली, मुंबई, कल्याण येथून महाड; भांडूप, मुंबई, बोरीवली येथून श्रीवर्धन; नालासोपारा व परळ येथून खुटील; ठाणे येथून पोलादपूर, बोरीवलीमधील खामगाव; स्वारगेटमधून माणगाव, मुंबई, नालासोपारामधून मुरुड एसटी बसेस असणार आहेत. तसेच परतीच्या मार्गावर जाणार्‍या प्रवाशांसाठी खुटीलमधून नालासोपारा, परळ, पोलादपूरमधून ठाणे, महाडमधून बोरीवली, मुंबई, कल्याण, गोरेगावमधून मुंबई, खामगावमधून बोरीवली, मुरुडमधून मुंबई, नालासोपारापर्यंत बसेस पाठविल्या जाणार आहेत. या बसेसच्या आरक्षणची व्यवस्था जिल्ह्यातील बसस्थानकात करण्यात आली आहे. चाकरमान्यांसह जिल्ह्यातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी केले आहे.

Exit mobile version