सध्याच्या काळातला हा मोठा प्रश्न झाला आहे. तुम्ही सतत कोणासोबत राहता, कोणाच्या व्हॉट्सअप ग्रूपमध्ये असता, कोणत्या प्रकारची टीव्ही चॅनल्स पाहता यावर आता तुमची मते ठरू लागली आहेत. तुम्हाला दुसरी बाजू समजेनाशीच झाली आहे किंवा तुम्ही तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करू लागला आहात. आता हेच पाहा ना. एसटी कर्मचार्यांच्या सहा महिन्यांच्या संपानंतरही त्यांच्या पदरात काहीही पडले नाही. तरीही ते व त्यांच्या नेत्यांनी आमचाच विजय झाला असे म्हणून गुरुवारी जल्लोष केला. खरे तर या आंदोलकांची मूळ मागणी ही एसटीला सरकारात विलीन करण्याची होती. जेणेकरून महामंडळाला नफा-तोटा किती झाला यावर त्यांचे पगार अवलंबून राहिले नसते. ते सरकारी कर्मचार्यांप्रमाणे झाले असते. ही मागणी अवाजवी आहे असे नव्हे. किंबहुना, पाणीपुरवठा, आरोग्य याप्रमाणेच सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चाचा पत्कर सरकारने घ्यायलाच हवा. पण ही मागणी योग्य रीतीने मांडली गेली नाही. अर्थात, तो स्वतंत्र विषय आहे. पण सरकारने ती मान्य केली नाही ही वस्तुस्थिती आहे. याबाबत नेमलेल्या समितीनेही पुन्हा हाच निष्कर्ष काढला. राज्य सरकारने संपाच्या आरंभीच्या काळात विलीनीकरण शक्य नसले तरी थोडी पगारवाढ देऊ केली व कामावर परत येण्याचे आवाहन केले. त्यानंतर जवळपास पाच-सहा वेळा माघारीसाठी या कर्मचार्यांना मुदत वाढवून देण्यात आली. त्यावेळी संघटनांनी अडेलतट्टू भूमिका घेतली. शेवटी न्यायालयाने त्यांचे कान टोचल्यानंतर आता ते तयार झाले. या कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर परत येण्यासाठी निर्वाणीची मुदत देण्यात आली. अशा रीतीने परत येणार्यांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असेही न्यायालयाने सरकारला सांगितले. हेच तर सरकारने पूर्वीही अनेकदा म्हटले होते. तरीही आपला मोठा विजय झाला आहे असे यांचे नेते म्हणत आहेत. नेतेमंडळी आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पण सर्वसामान्य एसटी कामगारांनाही आपणच जिंकलो असे वाटावे हे अनाकलनीय आहे. आजच्या टीव्ही, मोबाईल व इंटरनेटच्या युगात खरं तर कोणतीही एक माहिती किंवा एक बाजू दडवणं कोणालाही अशक्य आहे. संपावरचे एसटी कर्मचारी ही साधने वापरत असणार. वृत्तपत्रेही वाचत असणार. तरीही आपला लढा चुकीच्या दिशेने गेला हे एकतर त्यांना कळलेले नाही किंवा तसे मान्य करण्यास ते तयार नाहीत. त्यामुळे तुम्ही नेमके कोणाचे ऐकता असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांनी, मित्रांनी व हितचिंतकांनी त्यांना विचारायला हवा. दुसरे उदाहरण महागाईचे आहे. सध्या दर दिवशी पेट्रोल-डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे सार्वत्रिक महागाई वाढते आहे. सामान्य जनता मेटाकुटीला येऊ लागली आहे. तरीही काही लोक मात्र कुठाय महागाई असा सवाल करीत आहेत. शेतकर्यांचे उत्पन्न कसे वाढले आहे आणि कर्मचार्यांचे पगार किती वाढले आहेत हे सांगत आहेत. उघडच आहे की, हे सर्व लोक विशिष्ट अशा व्हॉटसॅप ग्रूपमध्ये आहेत. तिथे जी माहिती मिळते तेवढीच खरी असे ते मानत आहेत. हे विशिष्ट लोक कोण हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. पण मुद्दा हाच आहे की, तुम्ही कोणाचे ऐकता याला सध्याच्या काळात अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. पेट्रोल व डिझेलच्या महागाईचे पाहा. खरे तर कच्च्या तेलाचे बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल 2020 मध्ये प्रतिबॅरल चाळीस डॉलरच्याही खाली गेले होते. पण त्या स्वस्ताईच्या काळातही भारतात आपल्या पेट्रोलचे दर कमी करण्यात आले नाहीत. उलट ते सुमारे तीस-चाळीस रुपयांनी वाढलेच आहेत. युक्रेन युध्द हे गेल्या दोन महिन्यांमध्ये घडले. पण उत्तर प्रदेश निवडणुकांचा प्रचार सुरू होण्याअगोदरपर्यंत जगात स्वस्ताई झाली तरी आपल्याकडे मात्र तेलाची महागाई चालूच होती. तरीही कुठेय महागाई म्हणणारे लोक होतेच. सर्व काही छान चालू आहे, उत्तम विकास चालू आहे, कसलीही अडचण नाही अशा गोष्टी सांगायला कोणालाही आवडेलच. मुद्दा असा की तुम्हालाही सतत तेच ऐकायचे आहे का? आम्ही काय बोलतोय ते ऐकताय ना तुम्ही?
तुम्ही कोणाचे ऐकता?

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025