कामगाज दिवसभर स्थगित
| मुंबई | दिलीप जाधव |
खा. संजय राउत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. गोंंधळामुळे दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यात राज्यपालांच्या अभिभाषण आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चा, लक्षवेधी सूचना आदी कामकाज होऊ शकले नाही. मात्र राऊतांच्या विरुद्ध भाजपाचे आ.राम शिंदे, प्रविण दरेकर यांनी हक्कभंगाची सूचना दिली. यावर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी हक्कभंगाची सूचना मी तपासून गुरुवारी निर्णय देईन. मात्र मी राऊत यांना अटक करण्याचे निर्देश देऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकड़े ती मागणी करू शकता, असे सांगितले.
दरेकर म्हणाले की, राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे सभापती यांनी त्यांच्या विरुद्ध सुमोटो हक्कभंग दाखल करून अटकेचे निर्देश द्यावेत. यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य तपासण्याची आवश्यकता आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष सदस्यांना देशद्रोही म्हटले आहेत. बर झालं मी देशद्रोह्यांबरोबर चहापान घेतले नाही, असं वक्तव्य केले आहे. ते पण स्पष्ट झाल पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली. राष्ट्रवादीचे एकनाथ खड़से म्हणाले की, संजय राऊत हे या सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे ही चर्चा कशाला, जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. तुम्ही किती दिवस सभागृहाचे कामकाज बंद पाडणार आहात, अशी विचारणा त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. संजय राऊत जे बोलले ते मी ऐकले. चोर मंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेले बरं. हा सत्ताधार्यांवरच आरोप नाही तर संपूर्ण विधिमंडळाच्या सदस्यांना चोर म्हटले आहे. न्यायालयाच्या विरुद्ध बोललो तर तो कंटेम ऑफ कोर्ट होतो. तर विधिमंडळाच्या विरोधात बोलले तर अवमान होत नाही का? यावर कोणती ही कारवाई केली नाही तर उद्या कोणी ही आपल्या मनासारखे झाले नाही म्हणून विधिमंडळाला चोर म्हणतील. हा घोर अपमान आहे. याविरुद्ध एकमताने ठराव झाला पाहिजे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले. या वादावादीमुळे सभागृहातल्या गोंधळा मुळे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. शेवटी उपसभापतींनी यांनी दिवसभरा करिता कामकाज स्थगित करित असल्याची घोषणा केली .