भारतासाठी आज सोनियाचा दिनु

हॉकी, क्रिकेट, कबड्डी, तिरंदाजीत सुवर्णपदक

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची शनिवारची सकाळ भारतासाठी जणू सोनियाचा दिनुच ठरली. महिला तिरंदाजांनी सुवर्णपदक पटकावत चांगली सुरुवात केली. त्यानंतर मराठमोळा तिरंदाज ओजस देवतळने पुरुष गटात आणखी एक सुवर्णपदक पटकावत, या स्पर्धेतील सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. भारताच्या पुरुष कबड्डी संघाने इराणचा, तर महिलांनी यजमान चीनला अतितटीच्या सामन्यात चारी मुंड्या चित करीत सुवर्णपदकावर कब्जा केला. हॉकीतही भारताने सुवर्णपदकावर मोहोर उमटविली. दरम्यान, सुवर्णपदकांची लयलूट सुरू असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा पावसामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्याने सुवर्णपदकाची माळ भारताच्या गळ्यात घालण्यात आली. आजचा दिवस भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीमुळे ऐतिहासिक ठरला असून, देशाने 100 पदकांचा जादुई आकडा पार केला आहे.

हॉकीत चारली जपानला धूळ
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत जबरदस्ती कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावलं आहे. भारतीय संघाने दमदार कामगिरीसह मोहीम पूर्ण केली. कर्णधार हरमनप्रीतने दोन गोल केल्याने भारताने जपानला 5-1 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.

भारताकडून मनप्रीत सिंगने 25व्या मिनिटाला, हरमनप्रीत सिंगने 32व्या आणि 59व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 36व्या मिनिटाला आणि अभिषेकने 48व्या मिनिटाला गोल केले. जपानकडून तनाकाने 51व्या मिनिटाला संघासाठी एकमेव गोल केला. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला आहे.

मराठमोळ्या ओजसची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक

नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळेने भारताला तिरंदाजीत आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर, अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या एकल तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी भारताला आणखी दोन पदकं मिळवून दिली आहेत. महत्त्वाचं म्हणजे, पुरुष एकेरी तिरंदाजीमध्ये सुवर्णपदकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्येच लढत होती. ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा या दोन्ही भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आजच्या अंतिम फेरीत ओजस देवतळेने सुवर्णभेद केला आहे.


या स्पर्धेतील ओजस देवतळेचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. त्याने तिरंदाजीमध्ये पुरुष एकल, कपाऊंड आर्चरी आणि मिश्र तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावलं आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये भारताला मिळालेलं हे 26 वं सुवर्णपदक आहे.

महिलांची कबड्डीत सुवर्णपदकाची कमाई

भारतीय महिला कबड्डी संघाने अतितटीच्या सामन्यात यजमान चीनचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारतीय महिलांनी चित्तथराक झालेल्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईचा 26-24 अशा फरकाने पराभव केला आहे. महिला कबड्डी संघाने भारताला 27 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.


कबड्डीचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. भारत आणि चायनीज तैपेई महिला संघ यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. सुरुवातीला टीम इंडियाने आघाडी घेतली होती, मात्र नंतर चायनीज तैपेईने शानदार पुनरागमन केले आणि 9 मिनिटे शिल्लक असताना भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे विरोधी संघाने आघाडी घेतली. अशा स्थितीत स्कोअर 22-22 असा बरोबरीत पोहोचला होता. मात्र, अखेरच्या क्षणी भारताने टच पॉइंट मिळवत सामना 26-24 असा जिंकला.

पुरूष कबड्डीत भारताने इराणला नमवले

भारतीय पुरूष कबड्डी संघाने सुवर्ण कमगिरी करत भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 27 वर नेली. भारताने इराणचे कडवे आव्हान मोडून काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शेवटच्या सेकंदापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33-29 असा पराभव केला. भारताने मागील आशियाई स्पर्धेतील पराभवाचे उट्टे काढत इराणकडून सुवर्णपदक हिसकावून घेतले.


सामना सुरू झाला त्यावेळी भारतीय संघ पहिल्या सत्रामध्ये 6-9 असा पिछाडीवर होता. मात्र, भारतीय संघाने आपला खेळ उंचावत पहिले सत्र संपेपर्यंत 17-13 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रामध्येदेखील इराणने भारताला चांगलीच टक्कर दिली. इराणने 25-25 अशी बरोबरीदेखील साधली होती. मात्र सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना भारताने 28-26 अशी आघाडी घेतली. मात्र, इराणने भारताचे शेवटपर्यंत टेन्शन वाढवले होते. त्यांनी 28-28 अशी बरोबरी साधली. मात्र याचवेळी भारताच्या पवनच्या डू ऑर डाय रेडवेळी गोंधळ झाला. पवनने इराणच्या कोणत्याही बचावपटूने स्पर्ष करण्यापूर्वी ऑऊट ऑफ लाईन गेल्याचा दावा केला. यानंतर रेफ्रीने भारत आणि इराण या दोघांनाही एक एक गुण दिला. मात्र यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी वाद घातला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. अखेर अवघी काही मिनिटे शिल्लक राहिलाला सामना पुन्हा सुरू झाला अन्‌‍ भारताने गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पराभवाचे उट्टे काढले. भारताने 33-29 असा सामना जिंकत सुवर्णपदक जिंकले.

क्रिकेटमध्ये भारताला सुवर्ण बहाल

भारतीय पुरूष क्रिकेट संघानेही आपले पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने भारताला सरस रँकिंगच्या आधारावर सुवर्णपदक देण्यात आले.


भारताकडून अर्शदीप सिंग, शुवन दुबे, शाहबाज अहमद आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली तर अफगाणिस्ताकडून शाहिदुल्ला कमालने नाबाद 49 धावा करत डाव सारवला होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानचा निम्मा संघ 52 धावात गारद केला होता. मात्र त्यानंतर शाहिदुल्ला कमालने नाबाद 49 धावांची खेळी करत आपल्या संघाला 18.2 षटकात 5 बाद 112 धावांपर्यंत पोहचवले होते. कर्णधार गुलबदिन नैब 27 धावा करत त्याला चांगली साथ दिली होती. मात्र, त्यानंतर पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे सामना रद्द करावा लागला अन्‌‍ सरस रँकिंगच्या जोरावर भारतीय पुरूष संघाला सुवर्णपदक बहाल करण्यात आले.

बॅडमिंटनमधील पहिलं सुवर्ण

भारताची अव्वल बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराजने बॅडमिंटन पुरूष दुहेरीचं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी कोरियाच्या जोडीचा 21-18, 21-16 असा पराभव केला. विशेष म्हणजे, भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक आहे.


सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोरियाच्या चोई आणि किम वोनहो यांच्याविरूद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या गेममध्ये पिछाडीवर होते. त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पहिला गेम 21-18 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कोरियाच्या जोडीचे आव्हान 21-16 असे परतवून लावत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Exit mobile version