रायगडची क्रिकेटची मैदाने झालीत राजकारण्यांचे आखाडे
| रायगड/पाली | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीपासून रायगडच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. आ. महेंद्र थोरवे व खा. सुनील तटकरे यांच्यात वारंवार टीकेचे बाण सोडले जात आहेत. अलिबाग येथील एका कार्यक्रमादरम्यान महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तो औरंगजेब अकलूजमध्ये डेरा टाकून होता, तर आमचा औरंगजेब सुतारवाडी येथे आहे, अशी औरंगजेबाची उपमा तटकरे यांना देणारे खळबळजनक विधान केल्याने रायगडचे राजकारण चांगलेच तापले आहे.
रायगडमधील क्रिकेटची मैदाने जणू राजकारण्यांचे आखाडे झाले असल्याची परिस्थिती सर्वत्रच पहायला मिळत आहे. खा. तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्रीपदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. आणि तोच धागा पकडत आ. थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खा. तटकरे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, कॅप्टन कुल असतो. कॅप्टन कुल असल्याने चांगले निर्णय होतात, सामने ही जिंकता येतात, असे तटकरे वल्गना करतात. शिवाय पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगा पण माझाच खेळाडू, सर्व तुम्हालाच रायगड जिल्ह्यात मिळायला हवं, असे काही होणार नाही. क्रिकेटची उदाहरणे आम्हाला देऊ नका, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे थोरवे यांनी तटकरेंना सुनावले आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही दावा केला आहे. त्यामुळे हा वाद काही केल्या क्षमता क्षमत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून या दोन पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे शिवसेनेचे तिन्ही आमदार तटकरे यांच्यावर वारंवार टीकेची झोड उठवत आहेत. राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल; परंतु, पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील, आम्ही अशा राजकारणाला भीक घालत नाही, अशी जोरदार टीका आ. थोरवे यांनी यावेळी केली.
आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे. मात्र, थर्ड अंपायरने हा पालकमंत्रीपदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कप्तानने सर्व सहकार्यांना सामावून घेतले पाहिजे. खेळाडूंना प्राधान्य दिले पाहिजे आणि आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात, त्याचे भान ठेवा. आपले सहकारी, चांगले खेळाडू संघात यायला नको, त्यांना काही मिळायला नको, असे राजकारण असेल तर आम्ही ते चालू देणार नाही, अशी टीकासुद्धा थारवेंनी सुनील तटकरे यांच्यावर केली आहे.
पालकमंत्री गोगावलेच होणार!
कर्जत मतदारसंघातून आमदारकी लढवली येत्या काळात रायगडची लोकसभादेखील लढवणार आहे. पुढे तटकरे यांना ग्रामपंचायत सदस्यदेखील होऊ देणार नाही, तर कोणत्याही परिस्थितीत रायगडचा पालकमंत्री भरत गोगावलेंच होतील, ते पालकमंत्री होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला.
आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. एवढेच नव्हे तर, ही कालची गद्दारीची पिलावळ असून, त्यांना जशास तसे उत्तरे दिले जाईल. आदिती तटकरे यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. आमदार थोरवे यांचे पीए सचिन पाटेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आणि तत्कालीन शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीवर्धनमधील उमेदवार अनिल नवगणे याप्रसंगी बैठकीला उपस्थित होते. गेली 40 वर्षे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडसह महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली आहे.
माजी आमदार अनिकेत तटकरे