स्थानिकांसह पोलिसांसोबत घातला वाद; नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविण्याचा ठपका
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गुरुवारी (दि.6) दुपारी धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिबाग शहरासह रेवदंडा बायपास जवळ मद्यधुंदीत कार चालवून एका वाहनाला धडक दिली. सुदैवाने मोठी हानी टळली. दरम्यान, पोलीस व स्थानिकांसोबत या पर्यटकांनी वाद घातल्याची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. सूरज राजकुमार सिंगसह दोन पर्यटक असून, त्यात एका महिलेचा समावेश असून अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविण्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारमधून काही पर्यटक अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांच्या कारने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर रेवदंडा बायपासजवळ एका वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मद्यधुंदीमध्ये त्यांनी वाहन चालविल्याने अपघातात पर्यटकही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांसह अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कारमध्ये काही दारुच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच, पोलिसांसोबतही पर्यटकांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे.