| मुंबई | प्रतिनिधी |
बेस्टच्या चाकाखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दि.20 सकाळी गोल्डन नेस्ट परिसरात घडली आहे. येथील संथ गतीने सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तर, ठेकेदाराकडून ठिकठिकाणी डेब्रिज टाकल्याने हे रस्ते यमदूत बनले आहेत. केवळ एमएमआरडीए व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मळािलेल्या माहितीनुसार, मीरा रोड पूर्वेतील सोहेल पठाण हे त्यांचा मित्र मुस्तकिन सुजरा व दीड वर्षाचा चिमुकला अली अजगर पठाण यांच्यासोबत नयानगर परिसरात गेले होते. तेथून परतत असताना गोल्डन नेस्ट परिसरात रस्त्यावर टाकलेल्या डेब्रिजमुळे सोहेल यांची दुचाकी घसरली. या अपघातात ते तिघेही खाली कोसळले. यावेळी चिमुकला अली पठाण हा मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली चिरडला गेला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या दुर्घटनेमुळे आणखी किती जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला आहे.







