| अलिबाग | प्रतिनिधी |
आंबेपूर आठवडा बाजार, चंद्रमोळेश्वर मंदिर परिसरातील शापित म्हणून ओळखली जाणारी विहीर पुन्हा एकदा जीवावर उठली असून, यावेळी 10 वर्षीय निरागस मित लवेश चिपळूणकर याचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, या विहिरीने यापूर्वीही चार जणांचे जीव घेतले आहेत.
रा.जि.प. शाळा, पोयनाड येथे पाचवीला शिकणारा मित शाळा सुटल्यावर वडिलांसोबत कोचरेकरांच्या मुलांच्या हळदी सोहळ्यास गेला होता. वडखळच्या खानावळीत कामानिमित्त वडील परत गेल्याने मित हळदीच्या मंडपात थांबला होता. हळद लावणाऱ्या मुलांना दिले जाणारे खाऊचे पैसे मिळाल्यानंतर मित खेळत-खेळत बाहेर पडला आणि दुर्दैवाने कुप्रसिद्ध विहिरीजवळ पोहोचला. पाय घसरल्याने तो थेट विहिरीत कोसळला.
विहिरीत गटाराचे पाणी मिसळत असल्याने आणि शैवालाचे दाट थर असल्यामुळे, उपस्थित कोणालाही तातडीने उडी मारण्याची हिंमत झाली नाही. काही लहान मुलांनी ओरडत जाऊन मोठ्यांना माहिती दिल्यानंतर मंडपातील नागरिक घटनास्थळी धावले, परंतु परिस्थिती अत्यंत बिकट होती. मितचे काका चेतन चिपळूणकर यांनी धाडसाने पुढे येत पोलिसांसह मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरून काकांच्या मदतीने मितला बाहेर काढले. छातीतील पाणी काढण्याचे प्रयत्न झाले, मात्र तोपर्यंत तो गंभीर अवस्थेत होता. तातडीने शिंदे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता, मित जवळपास 20 मिनिटे पाण्यात अडकून असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पुढील उपचारासाठी आलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले, परंतु जास्त प्रमाणात पाणी पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.







