। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मजगांव ग्रामपंचायत हद्दीत एस.टी.स्थानका नजीक ओएनजीसीच्या सहकार्यातून बांधण्यात आलेल्या शौचालयाचे औपचारिक उद्घाटन होऊन दोन वर्षे झाली तरी शौचालय अद्याप खुले न झाल्यामुळे ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत शौचालय हस्तांतरण करण्याबाबत ठराव मांडला असता समसमान मते पडल्याने, अध्यक्षीय मत सरपंचांचे असल्याने खुद्द सरपंचांनी शौचालय हस्तांतरण करण्याबाबत थातूरमातूर कारण पुढे करीत असल्याचे विद्यमान सदस्य योगेंद्र गोयजी यांनी सांगितले. या शौचालय हस्तांतरणाला विरोध दर्शविण्यात आल्याने सुविधेपासून प्रवासी व ग्रामस्थांना वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
सदर शौचालय हस्तांतर करणेकामी सहा महिन्यापूर्वीच सुरभी संस्थेकडून पत्र व चाव्या ग्रामपंचायतला देण्यात आल्या होत्या. मात्र संस्था अध्यक्ष यांनी स्वतः ग्रामपंचायतला भेट देण्याचे कारण देऊन टाळाटाळ केली. मजगांवमध्ये सुविधा उपलब्ध असूनही केवळ सत्ताधारी व विरोधक यांच्या जुगलबंदीमुळे प्रवासी व ग्रामस्थांना वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
- शौचालयाबाबत मी स्वतः सुरभी संस्था अध्यक्ष यांना माहिती दिली असून त्यांच्या सवडीनुसार त्या ग्रामपंचायतला भेट देणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक या कामाचे सर्व कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असताना संस्था अध्यक्षांच्या भेटीचे प्रयोजन काय, हे मला देखील कळलेल नाही. – योगेंद्र गोयजी, ग्रामपंचायत सदस्य