रस्ता पूर्ण करा, मग टोल घ्या; वाहनचालक आक्रमक
| माणगाव | प्रतिनिधी |
बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोलनाक्यावर 15 मेपासून टोलवसुली सुरू करण्यात आल्याने वाहनचालक, कोकणवासीय, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अपूर्ण महामार्गावर टोल आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महामार्गाच्या अनेक भागांमध्ये अजूनही कामे रखडलेली असून ठिकठिकाणी खड्डे, धुळीचे साम्राज्य, अपुरे सेवा रस्ते, अर्धवट उड्डाणपूल आणि सुरक्षाव्यवस्थेचा अभाव यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत टोल आकारणी सुरू झाल्याने “अपूर्ण रस्त्यावर टोल कशासाठी?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गामुळे शेकडो अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा टोलवसुलीला प्राधान्य दिल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल देणार नाही,” अशी ठाम भूमिका अनेक संघटनांनी घेतली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारपाडा टोलनाका कार्यान्वित केला असून, सुकेळी खिंडीजवळील दुसरा टोलनाकाही तयार आहे. तेथूनही लवकरच टोलवसुली सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये महामार्गाची कामे अजूनही संथ गतीने सुरू असल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी वाहतूक अरुंद वळणमार्गांवरून सुरू असून, सेवा रस्त्यांच्या अभावामुळे स्थानिक ग्रामस्थांचा प्रवास धोकादायक बनला आहे.
पावसाळा तोंडावर असताना महामार्गावरील चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे. अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. अशा वेळी टोलवसुली सुरू केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी अधिक तीव्र झाली आहे. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे पर्यटक आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर आर्थिक भार वाढणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्ग पूर्णपणे सुरक्षित, खड्डेमुक्त आणि वाहतुकीसाठी सक्षम झाल्यानंतरच टोल आकारणी सुरू व्हायला हवी होती. अनेक पुलांचे जोडरस्ते अपूर्ण आहेत, माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम रखडले आहे, अनेक भागांमध्ये दिवाबत्तीची सुविधा नाही, तर सेवा रस्त्यांच्या अभावामुळे स्थानिक वाहतूक जीवघेणी बनली आहे. “सुविधा अपूर्ण, मग टोल पूर्ण कसा?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल
एनएचएआयने फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 24 तासांच्या आत परतीचा प्रवास केल्यास सवलतीचा दर लागू राहणार आहे. स्थानिक रहिवाशांसाठी मासिक पासची सुविधा देण्यात आली असली तरी रायगड जिल्ह्यातील एमएच-06 नोंदणी असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आंदोलनाचा इशारा
टोलवसुलीच्या विरोधात विविध सामाजिक संघटना, वाहन संघटना आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “रस्ता पूर्ण करा, मग टोल घ्या” अशी मागणी करत लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणवासियांमध्ये वाढत चाललेल्या असंतोषामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
