केंद्र सरकारकडून टेंडर काढून ठेकेदार निश्चितीची तयारी
| रत्नागिरी | प्रतिनिधी ।
मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वास जात असताना ओसरगाव टोल नाक्यावरून लवकरच पथकर वसुली सुरू होणार आहे. या टोल नाक्यासाठी केंद्र शासनाने निविदा मागविल्या आहेत. येत्या 24 तारखेला या निविदा उघडल्या जाणार असून, ठेकेदार निश्चित केला जाणार आहे, तर मेपासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे.
ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुलीसाठी यापूर्वी तीन एजन्सी नियुक्त झाल्या होत्या; मात्र या एजन्सीकडून टोल वसुली सुरू होताच टोलविरोधी कृती समिती आणि सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार आंदोलने सुरू केली. त्यामुळे ओसरगाव टोल नाक्यावरील टोल वसुली बंद केली आहे. यापूर्वी 14 जून 2023 ला टोल वसुली सुरू केली होती, ती आंदोलनानंतर बंद करण्यात आली. त्यानंतर गेली तीन वर्षे टोल नाका सुरू होण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यासाठी 17 एप्रिलला ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात जानवली पूल ते पत्रादेवी या 60 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुलीसाठी एजन्सी निश्चित केली जाणार आहे. यात दरवर्षी वाहनांकडून 57.88 कोटींचा टोल वसूल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
23 एप्रिलला ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे, तर 24 एप्रिलला नवी दिल्ली येथील महामार्ग विभागाच्या कार्यालयात निविदा उघडल्या जाणार असून त्याच दिवशी ठेकेदार निश्चित होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून मोटार, जीप आणि व्हॅन यांसारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण सर्वाधिक 49 टक्के आहे. बस आणि ट्रक (दोन ॲक्सल) वाहनांचे प्रमाण 27 टक्के, मल्टी ॲक्सल वाहनांचे प्रमाण 19 टक्के असल्याचेही निविदा नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. दुसरीकडे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याचीही कार्यवाही महामार्ग विभागाकडून सुरू केली आहे. यात सिंधुदुर्गातील ओसरगाव हा टोल नाका सर्वप्रथम सुरू करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे. महामार्ग विभागाने जाहीर केलेल्या निविदांमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही.







