खासदार वर्षा गायकवाड यांचे नितीन गडकरींना निवेदन
| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दि.6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनाने मुंबईत येतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोलमाफ करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.
खा. वर्षा गायकवाड यांनी दिल्लीत केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन टोलमाफीचे निवेदन दिले. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, खा. शिवाजीराव काळगे, खा. रविंद्र चव्हाण व खा.बळवंत वानखेडे उपस्थित होते. यावेळी खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे अनुयायी सर्वसामान्य समाजातील आहेत. आपल्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी ते मुंबईत येत असतात. मुंबईत येताना अनेक ठिकाणी टोल भरावा लागतो. हा टोलमाफ केल्यास बाबासाहेबांच्या अनुयायांना एक आर्थिक दिलासा मिळेल. टोलमाफ करून डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावनांचा व अस्मितेचा सन्मान करावा, असेही खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.







