| सोगाव | वार्ताहर |
सध्या टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना चांगले दिवस आले आहेत. मुंबईत टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. तर, अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारात 7 जुलै रोजी चांगल्या दर्जाचे टोमॅटो किरकोळ 90 ते 120 रुपये किलो दराने विक्री होताना दिसून आले. यावेळी बाजारात टोमॅटो खरेदीदारांनी नाराजी व्यक्त करत हात आखडता घेतला होता.
गेल्या आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. भाजी मंडईमध्ये टोमॅटोची आवक कमी होत असल्याने पुढील काही दिवस टोमॅटोचे दर चढेच राहणार असल्याचे भाजी विक्रेते राजा पाटील यांनी सांगितले. तसेच पुढील काळात पावसामुळे इतर भाज्यांची आवक कमी होणार असल्याने बहुतांश भाज्या महागणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे.